खुल्या प्रवर्गाच्या योजनांची माहिती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचण्यास आणि नव्या योजना तयार करण्यास होणार मदत
पुणे : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने एप्रिल महिन्यात राबवलेल्या अमृत परिवार सर्वेक्षण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात लक्ष्यित गटातील १५ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. यासाठी अमृत संस्थेच्या ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सुमारे चार हजार गावे प्रत्यक्ष फिरून पालथी घातली आणि माहिती गोळा केली. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच लक्ष्यित गटाच्या गरजांनुसार/आवश्यकतांनुसार विविध प्रकारच्या नव्या योजना तयार करण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे, असे प्रतिपादन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.
एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हात फिरून अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी हे सर्वेक्षण केले. कोकण, नागपूर, नाशिक, मराठवाडा, पुणे आणि अमरावती अशा राज्याच्या सर्व विभागातील गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वच ठिकाणी लक्ष्यित गटातील नागरिकांनी या सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच, अमृत संस्था राबवत असलेल्या योजनांबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आणि आपल्या अपेक्षाही सांगितल्या.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांचा लाभ मिळत नाही, त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या घटकांसाठी अमृत संस्था काम करते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश आहे. विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेच्या विविध योजना आहेत. या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी परिवार सर्वेक्षण करण्यात आले.
अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. त्यात व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्यविकास, रोजगारक्षम कौशल्यविकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, उद्योग/व्यवसायवृद्धीसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना आदींचा समावेश असून, लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यवर्धित योजना सर्व घटकांतील व वयोगटांतील लाभार्थ्यांसाठी तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी लक्ष्यित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी लक्ष्यित गटातील परिवारांचे हे सर्वेक्षण करण्यात आले.
या माध्यमातून लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचवण्यात आली. तसेच, अमृत संस्थेकडून सर्वांगीण विकासाच्या आणखी कोणकोणत्या योजना/उपक्रम राबवणे अपेक्षित आहे, याबद्दल विविध व्यक्तींची मते जाणून घेण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मुख्यालय पत्ता : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
ई-मेल : info@mahaamrut.org.in
मोबाइल : 9730151450
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment