मोबाइलवरून व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, रील्स व शॉर्ट फिल्म्स तयार करण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह यात दिले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रोफेशनल कोर्स सुरू करण्यात आला आहे. अमृत कौशल्यविकास योजनेअंतर्गत या कोर्सची पहिली बॅच २० डिसेंबर रोजी अमृत संस्थेच्या विभाग व जिल्हा कार्यालयात सुरू झाली.
आजच्या डिजिटल युगात तरुण-तरुणींना त्यांच्या मोबाइलमधूनच क्रिएटिव्ह काम करता यावे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाइल वापरून सिनेमॅटिक व्हिडिओ कसे शूट करायचे, लायटिंग, फ्रेमिंग, साउंडची मूलभूत माहिती, प्रोफेशनल मोबाइल एडिटिंग, स्टोरीटेलिंग, स्क्रिप्ट रायटिंग, तसेच सोशल मीडियासाठी रील्स आणि शॉर्ट फिल्म्स कशा तयार करायच्या याचे सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंग कसे करावे आणि स्वतःचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा, याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे.
या प्रशिक्षणासाठी नहुष बडगे (फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफी व डिजिटल व्हिडिओ कंटेंट) आणि आश्लेष जामरे (स्टोरीटेलिंग, मोबाइल एडिटिंग व सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन) हे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत.
कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मोबाइल फिल्म-मेकिंगचे वाढते महत्त्व, डिजिटल माध्यमांमधील करिअरच्या संधी आणि कौशल्याधारित प्रशिक्षणातून तरुणांनी स्वावलंबी कसे व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.
अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवले जाणारे असे रोजगाराभिमुख आणि सध्या मोठ्या मागणी असलेले कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम युवक-युवतींसाठी नोकरी व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
अक्षय चंद्रकांत लंबे, छ. संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत - 7391065475
योगेश भास्कर रोडे, जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत - 94032 00606
पत्ता : अमृत - विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment