सांगली जिल्ह्यातील आमणापूरमध्ये मोठ्या उत्साहात झाला अमृत मेळावा
सांगली : जिल्ह्यातील आमणापूर येथे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी १८ डिसेंबर रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अमृत आणि कृष्णाबाई मंदिर नदी संस्थेतर्फे हा अमृत मेळावा घेण्यात आला.
कृष्णाबाई मंदिर संस्थेचे अध्यक्ष गजाभाऊ कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे स्वागत केले. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे स्वागत विनायक गोरंबेकर यांनी केले. ब्राह्मण समाजातील तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत व्यक्त करून, अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रास्ताविकात गजाभाऊ कुलकर्णी यांनी केले.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन केले आणि प्रश्नांची उत्तरे दिली. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी आवश्यक कागदपत्रांबद्दल आणि निवडीच्या निकषांबद्दल सविस्तर माहिती दिली.
गोरंबेकर यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. तसेच गरजूंनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment