उपस्थितांनी व्यक्त केले समाधान
धुळे : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विविध विकास योजनांची माहिती देण्यासाठी धुळ्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कौशल्यविकास, स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश असून, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रसिद्ध आर्किटेक्ट रवी बेलपाठक, प्रसाद कुलकर्णी, मंगलम् रिसॉर्टचे मालक आदींसह शेखर कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, चेतन जोशी, गोरक्ष पाठक, उमेश पंचभाई, प्रशांत पाठक, दिनकर भट या वेळी उपस्थित होते.
अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना, महिला सक्षमीकरण योजना, तसेच युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम याबाबत अमृतमित्र विलास चंद्रात्रे यांनी या वेळी सविस्तर माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साह्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अमृत संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून, युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे चंद्रात्रे यांनी सांगितले.
संस्थेच्या या उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment