ग्राहकांकडून मिळाला उत्तम प्रतिसाद
जालना : स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळावे आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. प्राथमिक माहितीनुसार, या दोन दिवसांच्या प्रदर्शनात तब्बल तीन लाख ५७ हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली. १२ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता या प्रदर्शनाचा समारोप झाला.
या प्रदर्शनामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला, आकर्षक कपडे, दागिने, तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या उपक्रमामुळे विशेषतः महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची मोठी संधी मिळाली. ग्राहकांनाही एकाच ठिकाणी विविध दर्जेदार वस्तू खरेदी करता आल्याने प्रदर्शनात मोठी गर्दी पाहायला मिळाली. जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे आणि उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.
या विक्रमी विक्रीमुळे स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. 'सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. भविष्यात यापेक्षा अधिक भव्य आयोजन करण्यात येईल,' अशी ग्वाही आयोजकांनी दिली. या उपक्रमासाठी विनोदराय इंजिनीअरिंग, रोटरी क्लब जालना, एआय इन्शुरन्स मॉल, दक्ष वेध दैनिक, तसेच नृसिंह सामाजिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकंदरीतच अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम स्थानिक उद्योजकांसाठी नवी दिशा देणारा ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment