अनेक मान्यवरांनी दिली भेट; अमृत दिनदर्शिका देऊन करण्यात आले स्वागत
जालना : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जालन्यात आयोजित केलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेत भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष दीपाली बिनीवाले आणि वैशाली कुलकर्णी यांनी भेट दिली. अमृत दिनदर्शिका देऊन मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे व उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत केले.
थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची खास संधी ग्राहकांना यातून मिळाली होती. ग्राहकांनी गर्दी करून सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment