अमृत संस्थेच्या योजनांबद्दल झाले विचारमंथन
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नाशिक कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी त्यांचे स्वागत करून अमृत संस्थेबद्दल आणि योजनांविषयी सखोल माहिती दिली. भेट देणाऱ्यांमध्ये विभाग कार्यवाह प्रमोदराव कुलकर्णी, विभाग सहकार्यवाह राजेश राव, नाशिक शहर कार्यवाह सुहास वैद्य, जनकल्याण रक्तपेढीचे कार्यवाह शैलेश पंडित, सहकार्यवाह मदन भंदुरे, तसेच संघाच्या अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
या बैठकीत विविध योजनांवर विचारमंथन करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या योजनांबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून विविध अभिप्राय नोंदवले. तसेच, नवनवीन समाजोपयोगी योजना सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या सूचनांचा स्वीकार करून त्यावर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न अमृत संस्था नक्कीच करील अशी ग्वाही खाडिलकर यांनी उपस्थितांना दिली. चहापान झाल्यावर बैठकीचा समारोप झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment