१२ एप्रिलला रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांना थेट उत्पादकांकडून करता येणार दर्जेदार स्थानिक उत्पादनांची खरेदी
जालना : स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमृतपेठ - थेट बाजारपेठ उपक्रम जालन्यात आयोजित केला आहे. ११ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष विजय गो. राठी, सचिव उमेश बजाज आणि सुमेधा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, आकर्षक कपडे, दागिने तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक महिला व उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ग्राहकांनाही एकाच ठिकाणी विविध दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळत असल्याने प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, अस आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे व उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी केले आहे.
दिनांक : ११-१२ एप्रिल २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९
स्थळ : महेश भवन, मंठा चौफुली, जालना
अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065474, 9421944752, 9881086777
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment