स्थानिक लघुउद्योजकांना मिळणार पाठबळ; ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदी करता येणार दर्जेदार स्थानिक उत्पादने
नाशिक : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवर, आता नाशिक शहरात पुन्हा एकदा हे प्रदर्शन भरणार आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (त्याविषयीचे तपशील बातमीच्या शेवटी दिले आहेत.) स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
या दोन दिवसांच्या प्रदर्शनात विविध प्रकारचे ड्रेस मटेरिअल, लेगिन्स, कुर्तीज, साडी कलेक्शन, पर्स, कॉस्मेटिक, हेअर आर्टस्, कोकण फूड्स, बेडशीट, टॉवेल, पापड, लोणची, चटण्या, मसाले, बेकरी प्रॉडक्ट, आयुर्वेदिक प्रॉडक्ट, रेडिमिक्स पदार्थ, विविध प्रकारची ज्वेलरी, घर सजावटीच्या वस्तू, रांगोळी, मध व त्याचे प्रकार, पूजासाहित्य, खवय्यांसाठी विविध पदार्थांचे लाइव्ह फूड स्टॉल यांचा समावेश असेल. दर दिवशी लकी ड्रॉ काढून तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ग्राहकांना दर्जेदार व ताज्या वस्तू वाजवी दरात थेट उत्पादकांकडून घेण्याची संधी मिळणार असून, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा आणि उत्पादनांचा योग्य मोबदला मिळणार आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार खरेदीचा मुक्तपणे आनंद मिळेल. खवय्यांना फूड स्टॉलच्या माध्यमातून स्वादिष्ट व चवदार पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत असून, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवते. त्यात उद्योजकतेला सहाय्य करण्यासाठी अमृतपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे, महिला बचत गट, लघुउद्योजक, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थी व स्वयंरोजगार करणाऱ्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. राज्याच्या अनेक भागांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ - नाशिक
दिनांक : ११ आणि १२ एप्रिल २०२६
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत
स्थळ : स्वा. वि. दा. सावरकर हॉल (क्रॉम्प्टन हॉल), सावतानगर, सिडको, नाशिक.
अधिक माहितीसाठी संपर्क :
निखिल जोशी - ९८५०२०८७७७
अमृतपेठ जिल्हा व्यवस्थापक
मयूर हातवळणे - ८८३००४६२५६
अमृतमित्र
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment