परतवाडा येथील अमृतपेठ थेट बाजारपेठेला ग्राहकांचा विक्रमी प्रतिसाद
परतवाडा : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नुकत्याच झालेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाने एक विक्रम घडवला आहे. दोन दिवसांच्या या प्रदर्शनात ३७ स्टॉल्सवरून एकूण सुमारे साडेनऊ लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली. स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांकडून वाजवी दरात खरेदी करता यावीत, हा यामागचा उद्देश होता. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्याच्या अनेक भागांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असून, परतवाडा येथील प्रदर्शनाने विक्रीचा विक्रम केला आहे.
दोन दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये स्थानिक लघुउद्योजक, स्वयंरोजगार गट आणि महिला बचत गटांनी आपल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावले होते. त्यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. खरेदी-विक्रीसह मार्गदर्शन, नोंदणी आणि माहिती यांसारख्या सुविधा देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आमदार तायडे यांनी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली आणि अशा उपक्रमांमुळे परतवाडा शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे मत व्यक्त केले. अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली मथाने यांच्यासह अनेक नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आदींनी प्रदर्शनाला भेट देऊन स्टॉलधारकांचे मनोबल वाढवले आणि या उपक्रमाबद्दल अमृत संस्थेचे कौतुक केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment