चंद्रपूर जिल्ह्यात आठ एप्रिलपासून अमृत परिवार सर्वेक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी व योजनांचा लाभ देण्यासाठी गोळा करणार माहिती

चंद्रपूर जिल्ह्यात आठ एप्रिलपासून अमृत परिवार सर्वेक्षण मुख्य फोटो
मुख्य फोटो

चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष्यित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान आठ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत राबवले जाणार आहे.

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांचा लाभ मिळत नाही, त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या घटकांसाठी अमृत संस्था काम करते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश आहे. (सर्वेक्षणाअंती यात वाढ होण्याची शक्यता आहे.) विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेच्या विविध योजना आहेत. या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे.

अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. त्यात व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्यविकास, रोजगारक्षम कौशल्यविकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, उद्योग/व्यवसायवृद्धीसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना आदींचा समावेश असून, लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यवर्धित योजना सर्व घटकांतील व वयोगटांतील लाभार्थ्यांसाठी तयार करण्याचा मानस आहे. यासाठी लक्ष्यित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी लक्ष्यित गटातील परिवाराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास त्याचा कालावधी काही दिवसांसाठी वाढवण्यात येईल.

या माध्यमातून लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, अमृत संस्थेकडून सर्वांगीण विकासाच्या आणखी कोणकोणत्या योजना/उपक्रम राबवणे अपेक्षित आहे, याबद्दल विविध व्यक्तींची मते जाणून घेणे व त्या आधारावर नवीन आवश्यक योजना तयार करणे असा दुहेरी हेतू या सर्वेक्षणातून साध्य करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अमृत या संस्थेमार्फत वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना/उपक्रम यांची माहिती वेळोवेळी सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

विक्रम मोहन पांडे - 9112228774

चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

जिल्हा कार्यालय पत्ता :

गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, 

तुकूम, चंद्रपूर - 442402

ई-मेल : amrut.chandrapurdm@gmail.com

Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 09:52 PM News publication time | Views: 352 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news
Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 09:52 PM News publication time | Views: 352 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement