स्थानिक लघुउद्योजक, महिला बचत गट आणि स्वदेशी उत्पादनांना मिळाले प्रोत्साहन
सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' या प्रदर्शनाला सातारकरांनी उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला. स्थानिक लघुउद्योजक, महिला बचत गट आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश साध्य झाला.
लघुउद्योग, गृहोद्योग, तसेच नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. कार्यक्रमात विविध उद्योजकांनी आपापल्या उत्पादनांचे स्टॉल लावून विविध प्रकारची उत्पादने ग्राहकांसमोर मांडली. ग्राहकांनीही खरेदी करून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार व अमृतमित्र अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रदर्शनावेळी अमृत संस्थेच्या साताऱ्यातील लक्ष्यित गटातील काही मान्यवरांनी अमृत संस्थेच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या प्रदर्शनाचे नियोजन विनायक पाठकजी व अमृतसखी सौ. प्राजक्ता पाठकजी यांनी केले होते. त्यांच्या नेमक्या आयोजनामुळे सर्व स्टॉलधारक व ग्राहकांना सुविधा उत्तम रीतीने उपलब्ध झाल्या.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, सहभागी उद्योजक, महिला बचत गट व नागरिकांचे अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी आभार मानले. अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, भविष्यातही अशा प्रदर्शनांना अधिक मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विनायक पाठकजी - 9923197206
अमृत जिल्हा कार्यालय - 9112227638
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment