विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले नवचैतन्य
रिसोड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या किशोर विकास उपक्रमांतर्गत अमृत आनंद मेळावा हा एकदिवसीय निवासी वर्ग नुकताच वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील संत अमरदास बाबा संस्थानात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लहान मुलांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित व्हावी, देशभक्ती व राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी, तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने या निवासी वर्गामध्ये विविध उपक्रम, प्रयोग व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित उपस्थित होते. 'व्यक्तीनिर्माण झाल्यास देश निर्माण होतो,' याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. 'प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले संस्कार अंगीकारून समाज व देशासाठी योगदान करण्याचा संकल्प करावा,' असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, तसेच स्थानिक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Umesh Raut
7745859060
Write a Comment