ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे उद्योजकांना उभारी
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम तीन ते पाच एप्रिल या कालावधीत चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनात स्थानिक लघुउद्योजकांच्या ३० स्टॉल्सवरून पाच लाख रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली. या उपक्रमामुळे स्थानिक लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, तर ग्राहकांना दर्जेदार व स्वदेशी उत्पादनांची खरेदी करता आली.
उद्योगाच्या यशासाठी सक्षम बाजारपेठेची आवश्यकता असते. म्हणूनच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारपेठेचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. राज्याच्या विविध शहरांप्रमाणेच चंद्रपुरातही उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या या अमृतपेठ थेट बाजारपेठेमध्ये विविध लघुउद्योजकांनी आपले स्टॉल लावले होते. त्यात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील अनेक उद्योजकांचा समावेश होता. हस्तकला, घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे अशी वैविध्यपूर्ण उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली होती. दर्जेदार हँडमेड व स्वदेशी उत्पादनांनी ग्राहकांना आकर्षून घेतले. प्रदर्शनातील ३० स्टॉल्सवरून या तीन दिवसांमध्ये सुमारे पाच लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली. घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, तसेच विविध गृहोपयोगी वस्तूंनी सजलेले स्टॉल्स ग्राहकांच्या गर्दीने भरून गेले होते.
या उपक्रमातून उद्योजकांना ग्राहकांशी थेट संवादाची सुवर्णसंधी मिळाली आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाली. त्यामुळे हा उपक्रम लघुउद्योजकांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरला. ग्राहकांनी खरेदीतून स्थानिक उद्योजकांना पाठबळ दिले आणि त्यांना दर्जेदार व परवडणारी उत्पादने मिळाली. त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये मजबूत सेतू निर्माण झाला. भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम विविध तालुक्यांमध्ये आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सर्व स्टॉलधारकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. दरम्यान, चंद्रपूर व बल्लारपूर येथे अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण घेतलेल्यांना उद्घाटन कार्यक्रमात मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महापौर सौ. संगीता खांडेकर यांनीही आवर्जून उपस्थित राहून प्रदर्शनाची पाहणी केली. अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांनी या वेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे – 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
श्रीरंग खोंड – 7057909073
वैष्णवीताई दारवेकर – 9689473020
जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment