समाजभवन उपलब्ध करून देण्याची तयारी
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या प्रसारासाठी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, जिल्हा उपव्यवस्थापक वृषाली सवनकर आणि अमृतमित्र रवींद्र श्रौती यांनी नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३७च्या नगरसेविका निधी नितीन तेलगोटे यांची भेट घेतली.
अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अमृतपेठ आणि अमृतवर्ग या उपक्रमांबाबत या वेळी सविस्तर माहिती देण्यात आली. स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबन वाढवणे आणि स्थानिक उत्पादने थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे यावर चर्चा करण्यात आली.
नगरसेविका निधी तेलगोटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या प्रभागात अमृतवर्ग आयोजित करण्यासाठी समाजभवन स्वतःकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम त्यांच्या प्रभागात राबविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
अमृत संस्थेचे उपक्रम स्थानिक स्तरावर अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या बैठकीतून दिशा मिळाली असून, नागपूरमध्ये उद्योजकता व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment