अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाचे उद्घाटन; ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
परतवाडा (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या अमृतपेठ प्रदर्शनाचे उद्घाटन अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आमदार तायडे यांनी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, अशा उपक्रमांमुळे परतवाडा शहराच्या विकासाला चालना मिळेल, असेही मत व्यक्त केले.
दोन दिवसांच्या प्रदर्शनामध्ये स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार गट आणि महिला बचत गटांनी आपल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावले. नागरिकांकडून त्या स्टॉल्सना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. खरेदी-विक्रीसह मार्गदर्शन, नोंदणी आणि माहिती यांसारख्या सुविधादेखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. सहा एप्रिलला रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7249451152, 9527317068
दिनांक आणि वेळ : पाच व सहा एप्रिल २०२६, सकाळी १० ते रात्री १०
स्थळ : शेवाळकर सभागृह, वाघामाता संस्थान, परतवाडा, जि. अमरावती
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment