अमृतपेठच्या माध्यमातून लघुउद्योजिकांसाठी खुला झाला किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

पुणे : राज्यातील लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर जगभर पोहोचवण्यासाठी अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने उपलब्ध केलेल्या या प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक लघुउद्योजिकांनी करावा आणि स्वतःसह देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन अमृत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

पुणे : राज्यातील लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर जगभर पोहोचवण्यासाठी अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने उपलब्ध केलेल्या या प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक लघुउद्योजिकांनी करावा आणि स्वतःसह देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन अमृत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले. अमृतपेठची माहिती देणे आणि त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण लघुउद्योजिकांना देण्याचा कार्यक्रम आज (१९ डिसेंबर) अमृत संस्थेच्या पुण्यातील औंध येथील मुख्यालयात झाला. त्या वेळी ते बोलत होते. स्किलेट्झ फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. मिताली मोरे आणि अमृत संस्थेच्या आयटी कन्सल्टंट सौ. सुजाता मेंगाणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५ महिलांनी अमृतपेठच्या वापराचे प्रशिक्षण घेतले.

या वेळी बोलताना विजय जोशी म्हणाले, राज्यातील अगदी छोट्या-छोट्या गावांमध्येही अनेक महिला अत्यंत दर्जेदार उत्पादने तयार करत असतात. त्या त्या भागातील काही विशिष्ट उत्पादनांची खासियत असते; मात्र अशी उत्पादने दर्जेदार असली, तरी ती राज्याच्या किंवा देशाच्या इतर भागांमध्ये पोहोचण्यात अनेक अडचणी असतात. आज अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध असले, तरी त्यांचे कमिशन, कुरियर सेवाशुल्क वगैरे खर्चांमुळे लघुउद्योजकांना ते वापरणे अवघड ठरते. या पार्श्वभूमीवर, अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म राज्यातील लघुउद्योजकांसाठी आणि खासकरून छोटे उद्योग करणाऱ्या महिलांसाठी विकसित करण्यात आला आहे. या माध्यमातून उद्योजकांना आपली उत्पादने राज्यात आणि देशात तर पाठवता येतीलच; पण त्यांची निर्यातही करणे शक्य आहे.

विजय जोशी यांनी सांगितले, की अमृत संस्थेने भारतीय टपाल खात्याशी करार केला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही तुलनेत अत्यंत कमी दराची कुरियर सेवा या माध्यमातून उद्योजकांना मिळणार आहे. अमृतपेठच्या माध्यमातून निर्यातही करता येणार असून, ३५ किलोचे एक पार्सल याप्रमाणे १०० पार्सल्सपर्यंतची निर्यात करण्याची सुविधा अमृतपेठच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे जोशी म्हणाले.

अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून पाठवलेली उत्पादने परत आली (रिटर्न) तर त्याचा खर्च विक्रेत्याला सहन करावा लागतो; मात्र अमृतपेठच्या बाबतीत तसे होणार नाही. पाठवलेले उत्पादन काही कारणाने परत आलेच, तर त्याचा खर्च विक्रेत्याला करावा लागणार नाही. कारण अमृतपेठने रिटर्नच्या बाबतीत वन-वे कॉस्ट धोरण स्वीकारले आहे, असेही जोशी यांनी नमूद केले.

या महिलांच्या उत्पादनांमध्ये भारताबाहेर निर्यात करण्याची क्षमता आहे आणि त्यांची इच्छाही आहे, ही बाब कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांशी बोलताना प्रकर्षाने जाणवली. आता अमृतपेठ त्यांना ही संधी उपलब्ध करून देणार आहे, असे जोशी म्हणाले. लवकरच या महिलांची उत्पादने निर्यातीसाठी तयार होतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात सर्वांना अमृतपेठची माहिती देण्यात आली. तसेच, अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (ऑनबोर्डिंग) स्वतःची उत्पादने विक्रीला कशी ठेवायची, माहिती-फोटोज अपलोड कसे करायचे याचे संपूर्ण प्रशिक्षण प्रज्ञा रोडे आणि सौ. सविता जगताप यांनी दिले. या वेळी टपाल खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन केले. अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्याचे चांगले प्रशिक्षण दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त करून अमृत संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त लघुउद्योजिकांनी अमृतपेठचा वापर करून आपली उत्पादने सर्वत्र पोहोचवावीत आणि आपल्या उद्योगाचा विस्तार करावा, असे प्रातिनिधिक आवाहन उपस्थित महिलांनी राज्यातील महिलांना केले.

अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com

अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. जास्तीत जास्त उद्योजक उभे करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारची विविध कार्ये ही संस्था करत असून, संस्थेच्या अनेक योजना आहेत. संस्थेच्या योजनांची अधिक माहिती https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words