स्थानिक उत्पादकांना उत्तम व्यासपीठ; ग्राहकांना दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी
ठाणे : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा राज्याच्या सर्व विभागांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम आता ठाणे शहरात राबवला जाणार आहे. स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, हा त्यामागचा उद्देश आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतावाढीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. १८-१९ एप्रिलला ठाण्यात भरणार असलेल्या या प्रदर्शनासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर स्टॉल बुकिंग सुरू आहे.
स्थानिक महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, तसेच स्थानिक लघुउद्योजकांची विविध प्रकारची उत्पादने या प्रदर्शनात असतील. नवउद्योजकांना बळ देणे, महिलांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक व्यवसायांना नवी दिशा देऊन 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला बळ देणे हे त्यामागचे उद्देश आहेत. ही बाजारपेठ म्हणजे ठाणेकरांसाठी खरेदीचा उत्सव ठरेल आणि स्थानिक अर्थकारणाला चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरेल. त्यामुळे लघुउद्योजक, तसेच महिला बचत गटांनी स्टॉल बुकिंगसाठी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि ग्राहकांनी १८-१९ एप्रिलच्या वीकेंडच्या नियोजनात या प्रदर्शनाचाही समावेश करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : शनिवार १८ एप्रिल आणि रविवार १९ एप्रिल २०२६ (दिवसभर)
स्थळ : आई बिल्डिंग, सारस्वत बँकेच्या वर, जुन्या महाराष्ट्र बँकेसमोर, आइस फॅक्टरीजवळ, नौपाडा, ठाणे (पश्चिम)
अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 9112226533, 9322938828, 7021209405
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment