प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी देण्यात आले प्रोत्साहन
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने बल्लारपूरमध्ये आयोजित केलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. तरुण आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे आणि त्यांना व्यावसायिक कौशल्य प्रदान करणे या उद्देशाने हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
एक महिन्याच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना ब्रेड, केक, बिस्किट आणि इतर बेकरी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आला होता. प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत घेऊन आणि उत्साहाने प्रशिक्षण पूर्ण केले. समारोप समारंभात उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले.
या वेळी चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, अमृतमित्र सतीश नारायणदास, श्रीरंग खोंड, तसेच अमृतसखी सौ. वैष्णवी महागावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आणि सर्व पाहुण्यांचे व आयोजकांचे आभार मानण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment