महापौर संगीता खांडेकरही राहणार उपस्थित; उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तयार होणार सेतू
चंद्रपूर : येत्या तीन ते पाच एप्रिल या कालावधीत चंद्रपूरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठ भरवण्यात येणार आहे. राज्याचे माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तीन एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, चंद्रपूरच्या महापौर सौ. संगीता खांडेकर प्रमुख पाहुण्या म्हणून, तर अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शनाचे तपशील बातमीच्या शेवटी दिले आहेत.
राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण देण्यात आले. अमृतपेठेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, महिला स्वयंसहायता गट आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी या कल्पक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या या प्रयत्नांचे स्वागत केले. मुनगंटीवार यांनी या उपक्रमाच्या उद्घाटनाला येण्याचे निमंत्रण स्वीकारले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रत्येक उद्योजकाला एक नवी दिशा आणि मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज पेदुलवार, अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, अमृतमित्र सतीश नारायणदास, अमृतमित्र श्रीरंग खोंड व अमृतसखी वैष्णवी दारव्हेकर उपस्थित होत्या.
अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारची आकर्षक उत्पादने खरेदी करता येणार आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला, दागदागिने, तसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.
‘लोकल टू व्होकल’ संकल्पनेला बळ देणे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण स्थानिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला व्यवसाय व्यापक करावा. नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे यांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिवस आणि वेळ : तीन ते पाच एप्रिल २०२६. सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत
स्थळ : कन्यका परमेश्वरी हॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे – 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
श्रीरंग खोंड – 7057909073
वैष्णवीताई दारवेकर – 9689473020
जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment