चंद्रपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरमध्ये एका प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अमृत संस्थेच्या चंद्रपूर येथील जिल्हा कार्यालयात आज (१९ डिसेंबर) हे सत्र पार पडले.
चंद्रपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरमध्ये एका प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अमृत संस्थेच्या चंद्रपूर येथील जिल्हा कार्यालयात आज (१९ डिसेंबर) हे सत्र पार पडले.
उद्योजकता विकासाशी संबंधित असलेल्या अमृत संस्थेच्या, तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा विस्तृत परिचय करून देणे, भावी वाटचालीसाठी प्रभावी दिशा ठरवणे आणि उद्योजकता विकास व महिला सक्षमीकरण या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर थेट संवाद साधणे, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता. अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित आणि एमसीईडी संस्थेचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना योजनांची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंडित यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन, अमृत संस्था सदैव आपल्यासोबत आहे, असा दृढ विश्वास उपस्थितांच्या मनात निर्माण केला.
कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजना, उपलब्ध अनुदान (सबसिडी), निर्यात क्षेत्रातील संधी, तसेच महिलांसाठी बेकरी, ब्युटी पार्लर, गृहउद्योग आदी उपक्रमांबाबत प्रेरक मार्गदर्शन केले. लक्ष्यित गटातील प्रत्येक उमेदवाराला मदत करण्यासाठी अमृत आणि एमसीईडी या संस्था नेहमीच तत्पर आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम पांडे, तसेच एमसीईडी संस्थेचे चंद्रपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी संदीप जाने हेही उपस्थित होते. सत्रात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी अत्यंत समाधानकारक आणि स्पष्ट उत्तरे दिली. अमृत संस्थेच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांचा सकारात्मक प्रचार–प्रसार करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
पंडित आणि कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संख्या वाढविण्यासाठी एमसीईडी संस्थेच्या इतर कार्यक्रम आयोजकांसोबत प्रभावी नियोजनही करण्यात आले. या उपक्रमासाठी अमृत संस्थेचे नागपूर विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, चंद्रपूर जिल्ह्याचे उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, बल्लारपूर तालुका अमृतमित्र सतीश नारायणदास, तसेच एमसीईडी संस्थेच्या इतर कार्यक्रम आयोजकांचे विशेष सहकार्य लाभले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय,
नयनदेवी चांडक, गुरुद्वारा रोड, तुकूम, चंद्रपूर
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment