स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अमृतपेठ'सारख्या उपक्रमांची गरज : महापौर ज्योती गाडे

अहिल्यानगरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; १५ मार्चपर्यंत दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी

स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अमृतपेठ'सारख्या उपक्रमांची गरज : महापौर ज्योती गाडे मुख्य फोटो
स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अमृतपेठ'सारख्या उपक्रमांची गरज : महापौर ज्योती गाडे अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : 'स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अमृतपेठ'सारख्या उपक्रमांची गरज आहे. कारण अशा प्रदर्शनांमुळे स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात,' असे प्रतिपादन अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडे यांनी केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे उद्घाटन आज (१४ मार्च) त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. १५ मार्च रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांना या प्रदर्शनात दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी मिळणार आहे.

सावेडी येथील हॉटेल दी व्हाइट हाउसच्या सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात एकूण २६ स्टॉल्स असून, महिला उद्योजकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना विविध प्रकारची स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनातून मिळत आहे.

उद्घाटनानंतर महापौर ज्योती गाडे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून उद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद गंधे, नगरसेविका सुनीता कुलकर्णी , अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, छाया राजपूत, मोनाली कुलकर्णी, कालिंदी केसकर, सौ. वृषाली भोपे, मंगेश निसळ, वैभव कुलकर्णी, शरद क्षीरसागर, गौरी कुलकर्णी, 'बीबीएन'चे निखिल कुलकर्णी व हेमंत लोहगावकर उपस्थित होते.

राज्यातील विविध शहरांमध्ये अमृतपेठ - थेट बाजारपेठ या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगरमधील नागरिकांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती शुक्रे व आभारप्रदर्शन वृषाली भोपे यांनी केले.

प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने, तसेच हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश आहे. स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्राहकांचा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमृतपेठ बाजारपेठेविषयी :

दिवस आणि वेळ : १४ व १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ

ठिकाण : हॉटेल द व्हाइट हाउस, कोहिनूर मॉलजवळ, 'द ड्राय फ्रूट'मागे, सावेडी, अहिल्यानगर 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769 / 9766622274

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 14-03-2026 News publication date | Time: 08:13 PM News publication time | Views: 30 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 14-03-2026 News publication date | Time: 08:13 PM News publication time | Views: 30 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words