छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ प्रदर्शनाचे उद्घाटन; १५ मार्चपर्यंत ग्राहकांना दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी
छत्रपती संभाजीनगर : 'अमृत संस्थेचा अमृतपेठ हा उपक्रम 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देणारा असून, नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे,' असे आवाहन देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे उद्घाटन आज (१४ मार्च) त्यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १५ मार्च रोजी रात्री नऊपर्यंत सुरू राहणार असून, ग्राहकांना दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी आहे.
स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तूंच्या खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, उद्योजकतावाढीसाठी प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत अमृतपेठ या उपक्रमाचे आयोजन राज्याच्या विविध शहरांमध्ये करण्यात आले असून, तिथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून, तसेच भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी, सौ. सविता कुलकर्णी, नगरसेविका अॅड. सौ. माधुरी अदवंत-देशमुख, नगरसेविका सविता कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे अनिल मुळे, आदित्य धाराशिवकर, अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी सांगितले, 'अमृतपेठ हा उपक्रम प्रेरणादायी असून, स्थानिक उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त सकारात्मक पाऊल आहे. अशा मेळाव्यांमुळे आपल्या परिसरातील लघुउद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना स्वतःची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम संधी मिळेल. हा उपक्रम 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देणारा असून, नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. अशा उपक्रमांसाठी अमृत संस्थेचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.'
स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देणे आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने अमृतपेठेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उपयुक्त उत्पादनांचे आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कपडे, तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू उपलब्ध असून, नागरिकांना या वस्तू थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृतसखी मंजू कुलकर्णी, ऋचा शर्मा, अमृतमित्र रामेश्वर साळुंके, अजय कुलकर्णी, चिंतेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले.
शिवम मंगल कार्यालय,
छप्पन भोग हॉटेलच्या पाठीमागे,
देवळाई चौक, बीड बायपास परिसर
दिवस आणि वेळ : १४ आणि १५ मार्च २०२६ सकाळी नऊ ते रात्री नऊ
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक
योगेश भास्कर रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक
रामेश्वर साळुंके - 8010095930
अमृतमित्र
मंजू कुलकर्णी - 9404593726
अमृतसखी
ऋचा शर्मा - 7709080073
अमृतसखी
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment