अमृत संस्थेचे विभागातील कामकाज समन्वयातून होण्यासाठी होणार मदत
पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात अमृतमित्रांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांमधील अमृतमित्रांनी सहभाग घेतला.
अमृतमित्रांना अमृत संस्थेची उद्दिष्टे, कार्य आणि योजनांची सखोलपणे ओळख व्हावी, असा या सत्राचा उद्देश होता. त्यानुसार अमृतमित्रांनी सहभाग घेऊन या बाबी जाणून घेतल्या. या अमृतमित्रांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट घेतली. अमृत पर्यटन, अमृत दिशा, अमृत महाराष्ट्र, अमृतवर्ग, अमृत फ्रँचायझी, अमृत ड्रोन आणि अमृतपेठ यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबद्दल जोशी यांनी सखोल माहिती अमृतमित्रांना दिली. हे सर्व उपक्रम तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जोशी यांनी अमृतमित्रांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संभाजीनगरमधील विविध जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या अमृतमित्रांची एकमेकांशी समक्ष भेट झाली नव्हती; मात्र या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागातील सर्व अमृतमित्रांची एकमेकांशी प्रत्यक्ष भेट आणि ओळख झाली. त्यामुळे एकमेकांशी समन्वय साधून संस्थेचे कार्य प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरचे रामेश्वर साळुंके, जालन्याचे सत्यम अग्रवाल, बीडचे सुमित धिरडे, परभणीचे रवी कुलकर्णी, अनंत जोगदंड ,हिंगोलीचे संजय मेथेकर, नांदेडचे विश्वास बदापूरकर, लातूरचे प्रशांत कापसे, हृषीकेश कुलकर्णी आणि धाराशिवचे रवी वैद्य हे अमृतमित्र या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment