खुल्या प्रवर्गातील युवक-महिलांना मिळाली उद्योजक होण्यासाठीच्या योजनांची माहिती

अमृत संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यात उद्योजकता विकास व महिला सक्षमीकरणावरील मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. त्यात शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

खुल्या प्रवर्गातील युवक-महिलांना मिळाली उद्योजक होण्यासाठीच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

भंडारा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ डिसेंबर रोजी एका प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. एमसीईडीच्या भंडारा जिल्हा कार्यालयात झालेल्या या सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.

अमृत संस्थेच्या, तसेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता विकासाशी निगडित असलेल्या विविध योजनांचा सविस्तर परिचय करून देण्यासाठी, पुढील वाटचालीची प्रभावी दिशा ठरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्रात उद्योजकता विकास आणि महिला सक्षमीकरण या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर थेट संवाद साधण्यासाठी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित व एमसीईडी संस्थेचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.

देवदत्त पंडित यांनी अमृत संस्थेच्या अनेक योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, ही संस्था सदैव आपल्यासोबत आहे, असा दृढ विश्वास उपस्थितांच्या मनात निर्माण केला. श्रीकांत कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजना, उपलब्ध सबसिडी, निर्यात क्षेत्रातील संधी, तसेच महिलांसाठी बेकरी, ब्युटी पार्लर, गृह उद्योग अशा अनेक उपक्रमांबाबत प्रेरक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, की लक्ष्यित गटातील प्रत्येक उमेदवारासाठी अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर राहणार आहे.

या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे भंडारा जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास, एमसीईडी संस्थेचे भंडारा जिल्हा प्रकल्प अधिकारी कु. गायकवाड हेही उपस्थित होते. या सत्रात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी अत्यंत समाधानकारक व स्पष्ट उत्तरे दिली. अमृत संस्थेच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच सकारात्मक प्रचार–प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी श्री. पंडित आणि श्री. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एमसीईडी संस्थेच्या इतर कार्यक्रम आयोजकांसोबत प्रभावी नियोजन करण्यात आले. अमृत संस्थेचे नागपूर विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी आणि भंडारा जिल्ह्याच्या संगणकसखी कु. साक्षी जोशी यांच्यासह एमसीईडी संस्थेचे इतर कार्यक्रम आयोजक यांचे विशेष सहकार्य लाभले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 146 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 146 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words