सांगलीत १५ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ

दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची ग्राहकांना सुवर्णसंधी

सांगलीत १५ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवते. अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रमही त्यापैकीच एक असून, आतापर्यंत राज्यातील अनेक शहरांत त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा उपक्रम सांगलीत राबवला जाणार आहे. अमृत संस्था आणि सांगलीतील बीबीएन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या औचित्याने येत्या रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी अमृतपेठ थेट बाजारपेठ सांगलीत भरवण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यावसायिकांना यात सहभाग घेता येणार आहे.

अमृत संस्था प्रामुख्याने नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग उभे करण्यास मदत करत करते. तसेच, ही संस्था छोट्या उद्योजकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यवसायवाढीसाठी मदत करत असते. याचाच एक भाग म्हणून अमृत आणि बीबीएन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अमृतपेठ थेट बाजारपेठ या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही फक्त बाजारपेठ नसून, लक्ष्यित गटातील तरुण आणि नवउद्योजकांना घरगुती व्यवसायवाढीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच या व्यवसायिकांना अमृतपेठ या ऑनलाइन पोर्टलवर व्यवसायाची नोंदणी करता येणार आहे. 

ग्राहकांसाठी या ठिकाणी विविध दर्जेदार वस्तूंची दालने असतील. त्याचप्रमाणे विविध सेवा पुरवठादारांचे स्टॉलसुद्धा असणार आहेत. अमृतपेठेमध्ये प्रामुख्याने महिला व्यावसायिकांना प्राधान्याने स्टॉल देण्यात आले आहेत. गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ, वाळवणाचे पदार्थ, गृहोपयोगी वस्तू, लाकडी घाण्यावरील तेल, इमिटेशन ज्वेलरी, बॅग्ज व पर्स, पूजासाहित्य, कपडे, इलेक्ट्रिकल साहित्य, टूर्स व ट्रॅव्हल्स एजन्सीज असे अनेक प्रकारचे स्टॉल या प्रदर्शात असतील. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून या प्रदर्शनात निरामय विकास संस्थेतील गतिमंद मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉलही असेल. नागरिकांनी अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाला भेट देऊन, दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ

दिवस आणि वेळ : १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९

स्थळ : ऋतुरंग हॉल, १०० फुटी रोड, विश्रामबाग गणपती मंदिराजवळ, सांगली.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत संस्थेचे सांगली जिल्हा कार्यालय,

राजवाडा, सांगली - 9112228766, 7972830757

बीबीएन असोसिएशन, सांगली - 9699017713

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 08:12 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 08:12 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words