सांगली : अमृत या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेतर्फे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंजिरीताई गाडगीळ यांच्या हस्ते झाले.
सांगली : अमृत या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेतर्फे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंजिरीताई गाडगीळ यांच्या हस्ते झाले. १६ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम २२ जानेवारी २०२६पर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटनावेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार, कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी, सौ. गौरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात किरण बनसोडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. उद्घाटनपर भाषणात मंजिरीताई यांनी लक्ष्यित गटातील महिला उद्योगाचे प्रशिक्षण घेत असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. महिलांनी बेकरी व्यवसाय उभा करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे त्यांनी आवाहन केले. त्याचप्रमाणे विविध प्रदर्शनांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून या महिलांच्या बेकरी उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी अमृत संस्था पुणे विभागात आयोजित करत असलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली. सर्व महिलांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी बेकरी व्यवसाय उभा करून, भविष्याकरिता मोठ्या उद्योगाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी केले.
या वेळी विश्रामबाग ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी सौ. लीनाताई कुलकर्णी यांचा सत्कार सौ. गौरी कुलकर्णी यांनी केला. एमसीईडी संस्थेच्या प्रशिक्षक सौ. मोनिका माळी, सौ. वायदंडे याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी महिलांनी अमृत संस्थेचे आभार मानले. यशस्वी उद्योग उभा करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. सौ. गौरी कुलकर्णी यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप झाला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment