अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे 'एचआर कॉन्क्लेव्ह'मध्ये आवाहन
पुणे : 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. त्यांचा लाभ घेऊन महिलांना विविध क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होण्याची संधी आहे. अर्थात, त्यासाठी महिलांनी प्रयत्न करणेही गरजेचे आहे,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, एसएनडीटी कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्लेसमेंट सेल आणि अॅस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'एचआर कॉन्क्लेव्ह २०२६'मध्ये ते बोलत होते. एसएनडीटी महिला विद्यापीठात २८ फेब्रुवारीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन सत्रात जोशी यांचे भाषण झाले. त्या वेळी त्यांनी अमृत संस्थेतर्फे लक्ष्यित गटासाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली आणि अधिकाधिक महिलांनी योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
एसएनडीटी कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. भरत व्हंकटे, अॅस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गांधी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेले प्रवीण शुक्ला या वेळी प्रमुख वक्ते होते. उद्योग क्षेत्रातील बदलते कल, नेतृत्व कौशल्ये, करिअर नियोजन आणि महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
'भविष्यासाठी सज्ज महिला पदवीधरांसाठी उद्योग–अॅकॅडेमिया दुवा' या विषयावर पहिले परिसंवाद सत्र झाले. या सत्राचे संयोजन कायनेटिक कम्युनिकेशनचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. पॅनेलिस्ट म्हणून अॅमडॉक्स लिमिटेडचे संचालक (सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग) रवींद्र पाल सिंग, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक मंदार हलभावी आणि अॅपेक्स फंड सर्व्हिसेसच्या असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट नीलांजना बॅनर्जी यांनी उद्योग-शिक्षण समन्वय, कौशल्यविकास व रोजगार संधी यावर मार्गदर्शन केले.
दुसरा परिसंवाद 'एंट्री लेव्हलपासून नेतृत्वापर्यंत महिलांची प्रगती' या विषयावर चर्चा झाली. या सत्राचे संयोजन रीसेट रिच्युअल्सच्या संस्थापिका सौ. प्रीती दास यांनी केले. पॅनेलिस्ट म्हणून केसरी टूर्सच्या कार्यकारी संचालिका झेलम चौबळ, श्रम आणि रोजगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रीती साखरे, स्नेहल पोटेकर (मॅनेजर HR – युरोप व MEA) यांनी महिलांच्या करिअर वाढीतील आव्हाने व संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. एकंदरीतच उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा मजबूत करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ही परिषद विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment