विविध ब्राह्मण संघटनांनी एकत्र येऊन घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये झाला विशेष कार्यक्रम

विविध ब्राह्मण संघटनांनी एकत्र येऊन घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
विविध ब्राह्मण संघटनांनी एकत्र येऊन घेतली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती अतिरिक्त फोटो

राजापूर (जि. रत्नागिरी) : अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघ, राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळ व ब्राह्मण सेवा संघाचे कोंड्ये मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत संस्थेच्या विविध योजना आणि प्रशिक्षणांबाबत सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील युवक, महिला व उद्योजकांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश सप्रे, राजापूर तालुका ब्राह्मण संघ अध्यक्ष प्रवीण करंबेळकर, कार्यवाह रघुवीर बापट, तसेच कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाध्ये, विजय पाध्ये, जयेश हर्डीकर, अजित हर्डीकर, गिरीश लेले, श्रीधर प्रभुघाटे आणि कोंड्ये प्रभाग अध्यक्ष सुहास सोहनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय विविध मंडळांचे पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेतर्फे स्वयंरोजगार, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, युवक उद्योजकता विकास या विषयांशी संबंधित योजना राबवण्यात येतात. तसेच विविध अल्पकालीन व दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यांची सखोल माहिती या वेळी देण्यात आली. प्रशिक्षणाची रचना, कालावधी, प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष, शासनमान्यता, तसेच प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणारे रोजगार व व्यवसायसंधींचा आढावा सादरीकरणाद्वारे मांडण्यात आला.

कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी अमृत संस्थेच्या राज्यभरातील कार्याचा आढावा घेऊन ग्रामीण भागात कौशल्याधारित प्रशिक्षणांची वाढती गरज अधोरेखित केली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या अनुभवकथा सांगून उपस्थितांना प्रेरित केले. रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे यांनी स्थानिक स्तरावर अधिकाधिक युवक-युवती व महिलांनी अमृतच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून आगामी प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाला ११०हून अधिक पदाधिकारी, सभासद व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून समाधानकारक माहिती घेतली. भविष्यात संयुक्तरीत्या कौशल्यविकास शिबिरे, मार्गदर्शन कार्यशाळा व विशेष प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

समाजातील युवकांना रोजगारक्षम बनविणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व स्थानिक स्तरावर उद्योजकता वाढवणे या उद्दिष्टांसाठी अशा माहितीपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 01-03-2026 News publication date | Time: 05:01 PM News publication time | Views: 179 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 01-03-2026 News publication date | Time: 05:01 PM News publication time | Views: 179 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words