कोल्हापुरात अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षणाबाबत गुजराती समुदायातील महिलांना मार्गदर्शन
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यांची माहिती देण्यासाठी कोल्हापुरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रामुख्याने गुजराती समुदायातील ३५ ते ४० महिलांना 'अमृत'च्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 'अमृत संस्थेचा मुख्य उद्देश सक्षम उद्योजक घडवणे हा आहे,' असे या वेळी अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमाचे समन्वयक राजन डांगरे यांनी सांगितले. पूजा बेळगावकरही या वेळी उपस्थित होत्या. बैठकीमध्ये उपस्थित महिलांना उद्योजकतेच्या संधी आणि शासनाच्या कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात आली. राधा विश्राम पटेल, मीनाक्षी वल्लभ पटेल आणि जयश्री राजेश पाटील यांच्यासह समुदायातील अनेक महिलांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.
उद्योजक घडवण्यासाठी 'अमृत'चे प्रयत्न
राजन डांगरे यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले, की 'अमृत संस्थेचा मुख्य उद्देश सक्षम उद्योजक घडवणे हा आहे. कौशल्य प्रशिक्षण, व्यावसायिक कर्जावरील व्याजपरतावा आणि उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. प्रशिक्षणार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सर्व तांत्रिक सोयींनी युक्त असे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिले जाईल." पूजा बेळगावकर यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
विविध भागांत उपक्रमाचा विस्तार
यापूर्वी राजन डांगरे यांनी वारणा कोडोली, कुरुंदवाड आणि गारगोटी अशा विविध भागांत अशा बैठका घेऊन जनजागृती केली आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात 'अमृत' कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला.
उपस्थित महिला प्रतिनिधींनी या योजनांबद्दल समाधान व्यक्त केले असून, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment