नांदेडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विशेष व्याख्यानांचे आयोजन
नांदेड : मराठी भाषा गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यस्मरण अशी तीन औचित्ये साधून अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नायगाव (जि. नांदेड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अविनाश अंजनीकर प्रमुख वक्ते म्हणून, तर आयएमसी सदस्य लक्ष्मण बुद्धलवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेतील अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिन का साजरा केला जातो व जीवनात विज्ञानाचा वापर कसा करावा हे सांगितले. अध्यक्षीय भाषणात विश्वेश्वर जोशी यांनी मराठी भाषा गौरव दिनाबद्दल मराठी भाषेला असलेले जागतिक स्थान, तसेच संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी, संत एकनाथ महाराज यांच्यापासून ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांचे मराठी भाषेसाठीचे योगदान सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिटके मॅडम यांनी केले, तर श्री. जाधव यांनी आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment