अमरावती : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी झाले.
अमरावती : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी झाले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित होते.
‘जिल्ह्यात ‘अमृत’चे कार्यालय सुरू झाल्याने कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्वयंरोजगार संधी आणि औद्योगिक मार्गदर्शन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या दिशांना चालना मिळणार आहे,’ असे प्रतिपादन विजय जोशी यांनी या वेळी केले.
राज्यात विविध उपक्रम राबवणारी अमृत संस्था युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक कौशल्यविकासाबाबतीत प्रबोधन करत असते. आता या सर्व सुविधा अमरावतीमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी जलद गतीने होणार आहे. या वेळी विविध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच अमृत संस्थेचे लाभार्थी यांच्या भेटी घेण्यात आल्या. उद्घाटन कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यांतील अधिकारी, तसेच अमृत संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यालयाचा पत्ता :
आशीर्वाद बिल्डिंग, टोपेनगर, मालटेकडीसमोर, अमरावती : ४४४६०६
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227635
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment