नगरसेवक ऋग्वेद महेंद्र गंधे यांच्या हस्ते प्रतिमापूजन
अहिल्यानगर : शिवजयंतीनिमित्त अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक ऋग्वेद महेंद्र गंधे यांच्या हस्ते छत्रपतींचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी वैभव आव्हाड, सुमित बटुळे, सुजल झुंजारे, निखिल परदेशी, तुषार रोकडे, सागर भिंगारदिवे, कृष्णा वेल्हार आदी उपस्थित होते.
'निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू!
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी !!
जवळपास ४०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राने असा एक ‘शिवसूर्योदय’ अनुभवला, ज्याचा प्रकाश आजही प्रत्येक मराठी मनाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो. स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान यांच्या रक्षणाचा शिवरायांनी दिलेला हिंदवी वसा एकजुटीने आणि अभिमानाने पुढील पिढीमध्ये रुजवू या. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, प्रत्येक मराठी मनाचे प्रेरणास्थान, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत,' अशा शब्दांमध्ये अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि उपस्थितांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment