नुकताच पार पडला समारोप समारंभ
शेगाव (जि. बुलढाणा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे शेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. 'अमृत बेकरी प्रशिक्षणवर्गाची ही तुकडी म्हणजे स्त्री शक्तीच्या सबलीकरणाचे आदर्श उदाहरण आहे,' असे प्रतिपादन करून अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांनी सहभागी महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी बेकरी उत्पादने तयार करण्याचे कौशल्य तर आत्मसात केलेच; पण प्रत्यक्ष उद्योग उभारण्याची तयारीही दाखवून दिली. अनेक महिला रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत विविध बेकरी पदार्थ तयार करून आपला व्यवसायाविषयीचा समर्पणभाव सिद्ध करत होत्या.
'महिलांनी तयार केलेली उत्पादने आता ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून विक्रीसाठी उपलब्ध करून देता येतील. लवकरच अमृतपेठ उपक्रमांतर्गत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून महिलांचे नियमित अर्थार्जन सुरू होऊ शकेल,' असे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी सांगितले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) श्रीकांत कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे मनःपूर्वक आभार मानले. या वेळी बेकरी प्रशिक्षक आवटे सर व मॅडम, अंशू शर्मा, गणेश गुप्ता, अनिता शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
'या प्रशिक्षणामुळे आम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारची मदत अमृत संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे. यामुळे आम्ही आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत,' अशी भावना लाभार्थी आरती मिश्रा यांनी व्यक्त केली.
लाभार्थी टिबडेवाल यांनी अमृत संस्थेचे आभार मानून सांगितले, की 'या प्रशिक्षणामुळे आमचा व्यवसाय लवकरात लवकर सुरू होईल आणि आमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.'
या बेकरी प्रशिक्षणातून महिलांना केवळ कौशल्यविकासच नव्हे, तर उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती मिळाली आहे. तसेच, विक्री व्यवस्थापन आणि आत्मविश्वासाचा पायाही भक्कम झाला आहे.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाचा नवा मार्ग खुला झाला असून, भविष्यात अधिकाधिक महिलांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment