अमृत संस्थेचा मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या लाभार्थ्याचे मनोगत...
नमस्कार.
मी रूपेश बंगाळे, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पुण्यात मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये मी सहभाग घेतला होता. हे प्रशिक्षण १० दिवसांचे आणि डीजीसीए मान्यताप्राप्त होते. विशेष म्हणजे ते पूर्णपणे मोफत होते. मी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, प्रशिक्षणानंतर मला ड्रोन पायलट म्हणून अधिकृत प्रमाणपत्रदेखील मिळाले आहे. हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त, दर्जेदार आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शक ठरले.
आजच्या आधुनिक युगात ड्रोन तंत्रज्ञान हे अत्यंत वेगाने विकसित होत असलेले आणि संधींनी भरलेले क्षेत्र आहे. कृषी क्षेत्र, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षाव्यवस्था, तसेच छायाचित्रण व चलचित्र निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. अमृत संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
१. मध्यम व लघु वर्गातील ड्रोन पायलट प्रशिक्षण
२. प्रशिक्षक प्रशिक्षण
३. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर
४. आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तंत्रज्ञान
५. नकाशांकन व सर्वेक्षण
६. ड्रोन देखभाल व दुरुस्ती
७. ड्रोन छायाचित्रण व व्हिडिओ निर्मिती
८. व्यवस्थापन व सुरक्षा प्रशिक्षण
अशा अनेक विषयांपैकी उमेदवारांना आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार अभ्यासक्रम निवडता येतो.
या योजनेचा लाभ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील १८ ते ५५ वर्षे वयोगटातील उमेदवारांना घेता येतो. त्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विशेषतः शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींना प्राधान्य देण्यात येते. तसेच ज्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही, अशा तरुण-तरुणींनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा.
मी स्वतः अमृत संस्थेचा लाभार्थी म्हणून सांगू इच्छितो, की हे प्रशिक्षण तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांनी आणि शेतकरी कुटुंबातील युवकांनी या संधीचा लाभ घेऊन अधिकृत रिमोट पायलट लायसेन्स मिळवावे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी.
धन्यवाद.
- रूपेश बंगाळे, छत्रपती संभाजीनगर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment