उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास
लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. याअंतर्गत लातूर जिल्ह्यात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक दिवसाचा परिचय मेळावा घेण्यात आला.
या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड उपस्थित होते. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन साबळे मॅडम यांनी केले. प्रास्ताविकात शुभम मुळजकर यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहीती दिली . यानंतर दीपक गायकवाड यांनी उद्योजकता विषयातील वेगवेगळ्या विषयांवर, तसेच सूर्यमित्र प्रशिक्षणाची माहिती दिली. 'अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आम्ही उद्योजक होऊ,' असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आभारप्रदर्शन अमृतसखी कमलाक्षी कुलकर्णी यांनी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment