छत्रपती संभाजीनगरमधील लाभार्थी अभिजित कुलकर्णींचे प्रतिपादन; मिळाला ४४,८०० रुपयांचा परतावा
छत्रपती संभाजीनगर : अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली शासनाची स्वायत्त संस्था असून, उद्योजकांकरिता या संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित कुलकर्णींना या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४४ हजार ८०० रुपयांचा व्याजपरतावा मिळाला असून, या योजनेमुळे नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अभिजित कुलकर्णी हे दिरा एंटरप्रायझेस या संस्थेचे संचालक असून, ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सध्याच्या नियमानुसार आरईसीडी (रेट्रोफिट उत्सर्जन नियंत्रण उपकरण) या उपकरणांचा पुरवठा, स्थापना व कमिशनिंगचे काम करतात. तसेच ते प्लॅटिनो ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकृत डीलर आहेत. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी देवगिरी सहकारी बँकेकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यानंतर, डिसेंबर महिन्यात त्यांना अमृत संस्थेच्या योजनेअंतर्गत ४४ हजार ८०० रुपयांचा व्याजपरतावा मिळाला. यासाठी त्यांनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
या योजनेबाबत समाधान व्यक्त करताना अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले, 'अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेमुळे नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळतो. व्याजाच्या ओझ्यातून मुक्त होऊन कोणतीही चिंता न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येते.'
व्याजपरताव्याची रक्कम जमा झाल्यानंतर अभिजित कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या व्यवसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. अमृत संस्थेच्या अशा अनेक योजनांमुळे नवउद्योजकांना आर्थिक बळ मिळून रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको,
हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर- ४३१००९
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment