अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत शिरसवाडी, ता. जालना येथील श्री. नवनाथ देशमुख यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे.
व्याज परतावा योजनेचा लाभ घेत नवनाथ देशमुख यांची यशस्वी उद्योजकीय वाटचाल जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अशा जातींना, ज्यांना शासनाच्या स्वतंत्र विभाग, महामंडळ किंवा संस्थांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती, उद्योजक, नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे.
अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत शिरसवाडी, ता. जालना येथील श्री. नवनाथ देशमुख यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. श्री. नवनाथ देशमुख यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत वेट लिफ्टिंग क्रेन खरेदी केली. व्यवसायासाठी आवश्यक असलेली बँकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमृत संस्थेकडे वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज सादर केला. अमृत संस्थेकडून अर्जाची आवश्यक तपासणी व पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यांना LOI (Letter of Intent) प्राप्त झाले.
त्यानंतर बँकेशी संबंधित कायदेशीर व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या व्याजावर अमृत संस्थेच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी व्याज परताव्याचा लाभ श्री. नवनाथ देशमुख यांना मिळू लागला असून सध्या देखील हा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. “व्याज परतावा ही केवळ आर्थिक मदत नाही, तर व्यवसाय वाढविण्यसाठी आत्मविश्वास देणारा हात आहे”
अमृत संस्थेकडून मिळत असलेल्या व्याज परताव्याबद्दल श्री. नवनाथ देशमुख यांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “अमृत संस्थेकडून मिळणारा व्याज परतावा हा केवळ आर्थिक स्वरूपातील मदत नसून व्यवसायात सकारात्मक मानसिकता निर्माण करणारा आणि उद्योजकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मदतीचा हक्काचा हात आहे.”
व्यवसायात मेहनत, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर सामान्य परिस्थितीतून आलेली व्यक्तीदेखील यशस्वी उद्योजक होऊ शकते, हे नवनाथ देशमुख यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी रोजगाराची संधी निर्माण करण्याबरोबरच स्वावलंबनाचा आदर्शही निर्माण केला आहे.
कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायाची यशस्वी वाटचाल, वेट लिफ्टिंग क्रेन व्यवसायाच्या माध्यमातून नवनाथ देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आज समाधानी व आनंदी आहेत. व्यवसाय उभारणीच्या या प्रवासात कुटुंबीयांचे सहकार्य, स्वतःची मेहनत आणि अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेची मिळालेली साथ यामुळे व्यवसायाला सकारात्मक दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी श्री. नवनाथ देशमुख यांच्या व्यवसायाला भेट देऊन त्यांच्या व्यवसायाची पाहणी केली. त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमृत संस्थेच्या विविध योजना व प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना उद्योजकतेची संधी मिळत असून, नवनाथ देशमुख यांची यशोगाथा ही “शासकीय योजनेचा योग्य उपयोग, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर स्वावलंबी उद्योजक बनता येते,” याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment