महिला सक्षमीकरणासाठी अमृत संस्थेचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि 'अमृतपेठ'ची मिळणार सविस्तर माहिती
बुलढाणा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू हा आवर्जून केला जाणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यामध्ये महिला उपयुक्त वस्तूंचे वाण लुटतात. कोण काय वाण लुटणार, हाही खास चर्चेचा विषय असतो. बुलढाण्यात यंदा हळदीकुंकवाच्या निमित्ताने ज्ञानाचे वाण लुटण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जिल्ह्यात विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महिलांना अमृतपेठ या ऑनलाइन विक्री व्यासपीठासह विविध शासकीय आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृतपेठ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादनांची ऑनलाइन नोंदणी, फोटो अपलोड प्रक्रिया, किंमत निश्चिती, ग्राहकांशी संपर्क, ऑर्डर व्यवस्थापन, तसेच विक्रीतून उत्पन्नवाढ कशी साधता येईल याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली जाणार आहे.
महिलांसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, सोलर उपकरण प्रशिक्षण, मोबाइल फिल्म-मेकिंग, गृहोद्योग, अन्न व प्रक्रिया उद्योग अशा विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यातून महिलांनी उत्पादित केलेला माल अमृतपेठ प्लॅटफॉर्मवर कोणत्या पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल, याचेही प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे.
महिलांना केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या तयार उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा यामागचा उद्देश आहे. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा हा हळदीकुंकू कार्यक्रम महिलांसाठी सामाजिक स्नेहमेळाव्यासोबतच आर्थिक उन्नतीचा प्रभावी मंच ठरणार आहे. या कार्यक्रमाला बचत गट सदस्य, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या आणि उद्योजक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत संस्थेच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क :
जिग्नेश कमानी : 9112227637
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
ई-मेल : amrut.buldhana.dm@gmail.com
पत्ता :
अमृत जिल्हा कार्यालय,
305, फ्लॅट नंबर, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर,
बुलढाणा – 4443001
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment