विविध योजनांचा लाभ घेण्याचे होतकरू युवकांना आवाहन
येवला (जि. नाशिक) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांविषयी विशेष मार्गदर्शन आणि ब्राह्मण समाज एकजुटीसाठी येवला (नाशिक) येथे अमृत भिशीची सुरुवात करण्यात आली. चंद्रकांत देवगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमृत संस्थेच्या विशेष योजनांबद्दल नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
अमृत सूर्यमित्र, ड्रोन ऑपरेटर, अमृत बेकरी, अमृत आयात-निर्यात, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), अमृत अन्नपूर्णा (खाद्यपदार्थांचा छोटा व्यवसाय), अमृत अलंकार (इमिटेशन ज्वेलरी), अमृत आरीवर्क, मोबाइल फिल्म-मेकिंग यांसह सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. रोजगारासाठी आपण पात्र झाले पाहिजे, म्हणून उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त युवक आणि युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन दीपक गुप्ता यांनी केले.
या वेळी अमृत संस्थेच्या नवीन दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. या वेळी येवल्याच्या परशुराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228770 /8857073911
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment