केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी व्यक्त केले समाधान
केज (जि. बीड) : खुल्या प्रवर्गातील समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या उपक्रमांना प्रशासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अमृत संस्थेचे बीड जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. अमृत संस्थेची दिनदर्शिका तहसीलदार राकेश गिड्डे यांना भेट म्हणून देण्यात आली.
या भेटीमध्ये अमृत संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर आणि सखोल चर्चा झाली. अमृत संस्था कोणत्या लक्ष्यित गटासाठी कार्य करते, खुल्या प्रवर्गातील कोणकोणते समाजघटक अमृत संस्थेच्या कार्यक्षेत्रात येतात, तसेच त्या समाजघटकांसाठी राबवण्यात येणारे विविध सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराभिमुख उपक्रम यांची सविस्तर माहिती तहसीलदार गिड्डे यांनी जाणून घेतली.
नुकत्याच केज येथे पार पडलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाबाबत तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे अमृत संस्थेची कर्ज व्याजपरतावा योजना, ड्रोन प्रशिक्षण, तसेच अमृत कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विविध कौशल्यविकास व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम यांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. या सर्व उपक्रमांचा उद्देश खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना रोजगार व उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अमृत संस्थेचे कार्य, त्यामागील सामाजिक दृष्टिकोन आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली नियोजनबद्ध कार्यपद्धती ऐकून तहसीलदार राकेश गिड्डे यांनी समाधान व्यक्त केले. अमृत संस्थेचे कार्य अत्यंत उपयुक्त, काळाची गरज ओळखणारे आणि समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यामुळे ते भारावून गेले असून, पुढील काळात अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांना आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अमृत संस्थेच्या पुढील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांना स्वतः उपस्थित राहण्याचेही आश्वासन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिले. प्रशासकीय पातळीवरून मिळणारा हा पाठिंबा अमृत संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरणार असून, खुल्या प्रवर्गातील समाजघटकांच्या विकासासाठी अमृतचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment