‘अमृत संवाद सेतू’तून ४० विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवातून समजावी, या उद्देशाने उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोला येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात श्रीमती माहेरबानू कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, अकोला येथील ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शासकीय प्रशासनाची कार्यपद्धती, विविध विभागांची जबाबदारी, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. संबंधित विभागांचे कामकाज, शासकीय प्रक्रिया, नागरिकांच्या अर्जांवर होणारी कार्यवाही तसेच कार्यालयीन कार्यप्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेचे कामकाज जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.
‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शासन व प्रशासनाविषयी जागरूकता निर्माण करणे, शासकीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे आणि विद्यार्थ्यांना प्रशासकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे.
या प्रसंगी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक गणेश मुळे, डॉ. राखी मल्ली, प्रा. हर्षवर्धन देशपांडे, प्रा. पिनल शाह, अनिल वानखडे, पंकज बागडे, धीरज शाह तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील सुरतने उपस्थित होते.
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख झाल्याने हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक व भावी करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment