तेर येथे सुरू झाला 'अमृत'चा फॅशन डिझायनिंग आणि ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम

तीस दिवसांच्या मोफत प्रशिक्षणातून धाराशिवमधील महिलांना मिळणार आर्थिक स्वावलंबनाचे मार्गदर्शन

तेर येथे सुरू झाला 'अमृत'चा फॅशन डिझायनिंग आणि ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
तेर येथे सुरू झाला 'अमृत'चा फॅशन डिझायनिंग आणि ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त फोटो

धाराशिव : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने तेर (ता. धाराशिव) येथे फॅशन डिझायनिंग आणि ड्रेस मेकिंगचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. तीस दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन २६ डिसेंबर २०२५ रोजी झाले. महिला आणि युवकांना स्वयंरोजगाराच्या दिशेने सक्षम करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी 'एमसीईडी'चे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, अमृतसखी, अमृतमित्र, प्रशिक्षणार्थी लाभार्थी, तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उद्योग सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग व ड्रेस मेकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, पुढील ३० दिवसांत होणाऱ्या सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सविस्तर माहिती, बाजारपेठेतील मागणी, खर्च नियोजन, नफा व्यवस्थापन, तसेच स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या कसा उभारावा व टिकवावा याबाबत या वेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी महिलांना डिझायनिंग, कटिंग, स्टिचिंग, फॅब्रिक सिलेक्शन, ट्रेंड अ‍ॅनालिसिस, ग्राहक व्यवस्थापन यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत आणि 'एमसीईडी'च्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबनाच्या दिशेने नेणारा ठरेल, असा विश्वास या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 10:00 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 10:00 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words