कुंडलमध्ये अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

नोकरीच्या मागे न लागता अमृत संस्थेच्या साह्याने प्रशिक्षण घेऊन उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन

कुंडलमध्ये अमृत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

कुंडल : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडल येथे अमृत मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गासाठी काम करते. या योजनांची माहिती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता. लक्ष्यित गटात ब्राह्मण समाजाचा समावेश आहे.

मेळाव्याच्या सुरुवातीला ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे, तसेच प्रदीप चिटणीस यांनी अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात ब्राह्मण सभेचे अध्यक्ष वासुदेव अभ्यंकर यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. त्यांनी आपल्या समाजातील व्यावसायिकांना व महिलांना उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्थेच्या योजनांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी असलेली वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. 'समाजबांधवांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून त्याआधारे उद्योग–व्यवसायाची सुरुवात करावी,' असे आवाहन त्यांनी केले. लक्ष्यित गटातील नागरिकांनी त्यांच्या मनातील प्रश्न व शंका विचारल्या. त्यांची समर्पक व सविस्तर उत्तरे जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. सर्वांनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी उपस्थितांना आवश्यक कागदपत्रांबद्दल व निवड निकषांची सविस्तर माहिती दिली.

समारोपात संदीप कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे आणि उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अमृतमित्र म्हणून समाज जागृतीचे काम स्वयंसेवी पद्धतीने करण्याची तयारी दर्शविली. या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील समाजबांधव उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 05:56 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 05:56 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words