प्रदर्शनातून घ्या कृषी उद्योगाची प्रेरणा आणि अमृत संस्थेच्या योजनांच्या साह्याने घ्या उंच झेप
अकोला : कृषिक्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे ॲग्रोटेक २०२५ प्रदर्शन होणार आहे. या भव्यदिव्य कृषी प्रदर्शनात कृषी महोत्सव, पुष्प प्रदर्शन, पशू प्रदर्शन आणि चर्चासत्रेही होणार आहेत. केवळ विदर्भच नव्हे तर राज्यासह इतर राज्यांमधूनही शेतकरी येथे येतात.
यंदा ५५०हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज, नैसर्गिक शेती अभियानासह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांच्या उत्पादक कंपन्या, यंत्र-अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बी- बियाणे, खते,औषधे, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निविष्ठा उत्पादक कंपन्याही सहभागी होणार असून, कृषी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालनेही यात असतील. विदर्भातील स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली कृषी पूरक उत्पादने व खाद्यपदार्थांचे स्टॉलदेखील यात असतील. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी अत्याधुनिक शेती व्यवसायातील नावीन्यपूर्ण बाबींचे प्रदर्शनही यात असेल. ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे, अवजारे, पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेक जाती फळे, फुले, रानभाज्या आदींचे प्रदर्शनही निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे.
अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन बनता येईल उद्योजक
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यात ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमासह विविध प्रकारची कौशल्याधारित प्रशिक्षणे, व्यवसायासाठीच्या कर्ज व्याजपरताव्यासारख्या अर्थसाह्याच्या योजना वगैरेंचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment