दिवेआगर येथे उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा - रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवेआगर येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा’ या उपक्रमांतर्गत रानभाजी पदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

दिवेआगर येथे उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा -  रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
दिवेआगर येथे उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा -  रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा’ या उपक्रमांतर्गत, पावसाळ्यातील पारंपरिक रानभाज्यांचा आस्वाद, त्यांचे औषधी महत्त्व आणि महिलांच्या पाककलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिवेआगर येथे रानभाजी पदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. सुहास बापट यांच्या हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत परिसरातील १६ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला परीक्षकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतमाता पूजन व अन्नपूर्णा देवी पूजन करण्यात आले. श्रीमती गोडबोले व उपस्थित भगिनींनी भावपूर्ण वातावरणात अन्नपूर्णा स्तोत्राचे सामूहिक पठण केले. यावेळी श्रीमती गोडबोले यांनी परीक्षक सौ. वृंदा विनायक मराठे व सौ. उर्मिला श्रीनिवास केळकर यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याची माहिती उपस्थित महिलांना दिली.


यानंतर अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे तसेच उपव्यवस्थापक श्री. मंगेश भागुराम ढेबे यांनी उपस्थित महिलांना दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पर्धेत सहभागी महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध पारंपरिक रानभाज्यांपासून पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ तयार करून आकर्षक पद्धतीने सादर केले. परीक्षकांनी पदार्थांची चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट, मांडणी आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षण करून गुणांकन केले. विशेष म्हणजे, विना कांदा-लसूणीच्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रानभाजी पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला.


स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. इतर सहभागी महिलांनाही सहभाग प्रमाणपत्रासह आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.


यावेळी उपस्थित महिलांनी अमृत संस्थेचे आभार व्यक्त करत, “अशा प्रकारचे उपयुक्त, संस्कृती जपणारे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित करावेत. आम्ही भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये नक्की सहभागी होऊ,” अशी भावना व्यक्त केली.


यावेळी बोलताना जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे म्हणाले की, या स्पर्धेचा उद्देश केवळ पाककलेला वाव देणे नसून अमृत संस्थेच्या योजनांची माहिती समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हाही आहे. घरातील अन्नपूर्णा असलेल्या महिलांपर्यंत एखादी चांगली माहिती पोहोचली की ती संपूर्ण कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून योजनांचा व्यापक प्रसार होण्यास मदत होते.


ते पुढे म्हणाले की, पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या या नैसर्गिक औषधी गुणांनी समृद्ध असतात. दमट व कुंद वातावरणात उद्भवणाऱ्या अनेक लहान-मोठ्या विकारांवर त्या उपयुक्त ठरतात. विशेषतः महिलांना या रानभाज्यांचे गुणधर्म आणि उपयोग अधिक चांगल्या प्रकारे माहिती असतात. त्यामुळे या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन, नैसर्गिक आरोग्य संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत या ज्ञानाचा वारसा पोहोचावा, या संकल्पनेतून ‘उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. पसायदानाने स्पर्धेची सांगता झाली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/






Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 03:59 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 03:59 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement