सिन्नरमधील संवाद मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

अमृत संस्थेने ब्राह्मण पुरोहित संघाच्या सहकार्याने केले आयोजन

सिन्नरमधील संवाद मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
सिन्नरमधील संवाद मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

सिन्नर (जि. नाशिक) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने सिन्नर तालुका पुरोहित संघाच्या सहकार्याने सिन्नरमधील श्रीराम मंदिरात अमृत संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला ब्राह्मण आणि मारवाडी समाजातील प्रतिष्ठित बांधव, सदस्य, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिन्नर तालुका पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज खेडेकर यांनी केले. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी आणि अमृतमित्र मयूर हातवळणे यांनी या वेळी दिली. अमृत संस्थेच्या माध्यमातून अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजना राबवली जात असून, १२ हजार ५०० लाभार्थी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याची पूर्ती करण्याकरिता प्रशिक्षणासंदर्भातील माहिती या वेळी देण्यात आली.

खुल्या प्रवर्गातील समाजाला आजवर अनेक शासकीय योजनांची माहिती व थेट लाभ मिळत नव्हता; मात्र अमृत संस्थेच्या माध्यमातून आता या समाजघटकांसाठी विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये इच्छित उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, सी-डॅकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांतील कोर्सेस मोफत करण्याची सुविधा, तसेच शासकीय टंकलेखन व लघुलेखन (जून 2025) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परतावा अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

तसेच एमपीएससी/यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना पुढील तयारी व मुलाखतीसाठी आर्थिक साहाय्य, AIIMS, IIT, IIM, IIIT अशा संस्थांमध्ये प्रवेशासाठी आर्थिक पाठबळ, NIELIT, CIPET, IGTR या संस्थांच्या निवडक अभ्यासक्रमांची पूर्ण फी अमृत संस्थेकडून मिळते. अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमांतर्गत आवश्यक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध आहे. व्यावसायिक बांधवांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या 'अमृतपेठ' या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांची विक्री देशभर करता येणार आहे. तसेच १५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा मिळण्याची सुविधाही अमृत संस्थेकडून देण्यात येते, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

समाजातील पुढची पिढी देशभक्तीच्या भावनेने घडावी यासाठी प्रत्येक शाळेतून अमृत वर्ग घेण्याचे नियोजन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दीपावलीनिमित्त आयोजित अमृत दुर्गोत्सव २०२५ उपक्रमांतर्गत घरोघरी दुर्ग उभारणी करून मानवंदना देण्यात आली असून, या मोहिमेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली.

माहिती सत्रानंतर महिलांनी प्रशिक्षण व मार्केटिंग संदर्भात प्रश्न विचारले. सुरू असलेल्या व्यवसायांना व्याजपरतावा योजनेचा लाभ कसा घेता येईल, याची माहिती घेऊन अनेकांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली.

या कार्यक्रमासाठी सिन्नर तालुका पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज खेडेकर व कार्याध्यक्ष दिलीप बिडवई यांनी विशेष प्रयत्न केले. डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थळाचे वंशज चंद्रशेखर बर्वे यांचीही या वेळी विशेष उपस्थिती होती. आभारप्रदर्शन दीपक कुलकर्णी यांनी केले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 04:26 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 04:26 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words