विनायक पांडुरंग करमरकर: दगडाला आत्मा देणारा शिल्पकार

विनायक पांडुरंग करमरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

काही कलाकार रंगांनी चित्र रेखाटतात, काही शब्दांनी भावना व्यक्त करतात; पण विनायक पांडुरंग करमरकर यांनी दगड आणि कांस्याला जिवंत स्पंदन दिले. त्यांच्या हातातील छिन्नी आणि हातोडा हे केवळ शिल्प घडवण्याची साधने नव्हती, तर भारतीय संस्कृती, इतिहास आणि मानवी भावविश्वाला अमरत्व देण्याची माध्यमे होती.कोकणातील साध्या वातावरणातून आलेल्या या प्रतिभावान कलाकाराने आपल्या अथक परिश्रम, अभ्यास आणि कलाप्रेमाच्या जोरावर भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या शिल्पांमध्ये केवळ चेहऱ्यांचे साम्य दिसत नाही, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, भावना आणि जीवनाचा प्रवासही अनुभवायला मिळतो.

विनायक पांडुरंग करमरकर: दगडाला आत्मा देणारा शिल्पकार मुख्य फोटो
विनायक पांडुरंग करमरकर: दगडाला आत्मा देणारा शिल्पकार अतिरिक्त फोटो

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पर्यटक अलिबागमध्ये ठराविक स्थळांना भेट देतात आणि परततात. परंतु अलिबागच्या जवळपास अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे सासवण्याचे नानासाहेब करमरकर शिल्पालय . अलिबागकडून रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावर १८ किलोमीटरवर सासवणे नावाचे गाव आहे. इथे पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध शिल्पकार कै. विनायक तथा नानासाहेब पांडुरंग करमरकर यांच्या राहत्या घरामध्ये करमरकर शिल्पालय साकारले आहे.

२ ऑक्टोबर १८९१ रोजी सासवणे येथे जन्माला आलेले करमरकर हे शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या देवनार येथील स्टुडिओमधील अनेक शिल्पे त्यांच्या मृत्यूनंतर (१३ जून १९६७) सासवण्याच्या एकमजली बंगल्यामध्ये हलविण्यात आली होती. हा बंगला सन १९३४ मध्ये बांधला होता. २ ऑक्टोबर १९८६ रोजी त्यांच्या शिल्पांचे अधिकृत शिल्पालयात रूपांतर करण्यात आले आहे. या संग्रहालयाला शिल्पकलेची पंढरीच म्हणायला हवे. नानासाहेबांनी त्यांच्या पाऊणशे वर्षांच्या आयुष्यात साकारलेली जवळपास २००हून अधिक शिल्पे इथे प्रदर्शनार्थ मांडलेली आहेत. करमरकरांनी अप्रतिम शिल्पे भारतभर अनेक ठिकाणी उभारलेली आहेत. त्यापैकी पुण्यातील भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा एकसंध अश्वारूढ पुतळा शिल्पकलेच्या क्षेत्रात आजही मैलाचा दगड आहेत. बेल्लूर मठातील रामकृष्ण परमहंस यांचे संगमरवरी शिल्प, मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल यांचे शिल्प असो, की उच्च न्यायालयाच्या आवारातील जस्टीस मुल्ला यांचा पुतळा... अशी असंख्य स्मारके त्यांनी बनवली. परंतु नानासाहेबांच्या शिल्पकलेचे वैविध्यतेने नटलेले शिल्पवैभव आपल्याला सासवण्याच्या त्यांच्या शिल्पालयात पाहायला मिळते. त्यांच्या बंगल्याच्या आवारात काही शिल्पे आहेत, तर काही पहिल्या मजल्यावर मांडलेली आहेत. त्यांच्या संग्रहालयात फक्त माणसांची शिल्पे आहेत असे नव्हे, तर कुत्रा, मांजर, माकड, त्यांची पिल्ले अशी प्राण्यांची शिल्पेही आहेत. आवारात असलेला म्हशीचा पूर्णाकृती पुतळा आपल्याला हात लावून खात्री करण्यास प्रवृत्त करतो इतका हुबेहूब आहे. त्यांच्या घरी काम करणारी मंडळी, कुटुंबातील व्यक्ती याचबरोबर गांधीजींना समोर बसवून केलेल्या शिल्पासह कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांना इथे शिल्परूपाने साकारले आहे. त्यांच्या शिल्पांमधील बारकावे इतके सूक्ष्मपणे दाखवलेले आहेत की आपण मंत्रमुग्ध होतो. त्यांच्या शिल्पांची मांडणी, रचनाबंध आणि भाव यामुळे ती सजीव वाटतात.
करमरकर यांची कला वास्तववाद आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम होती. त्यांनी घडवलेली अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वांची शिल्पे आजही संग्रहालये, सार्वजनिक ठिकाणे आणि कलादालनांमध्ये त्यांच्या प्रतिभेची साक्ष देत उभी आहेत. प्रत्येक शिल्प पाहताना असे वाटते की ते बोलू लागेल आणि त्यामागची कथा सांगेल.

१३ जून १९६७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण कलाकार कधीच पूर्णपणे जात नाही. त्याची कला पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहते. आजही महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक तरुण शिल्पकारांसाठी करमरकर हे समर्पण, शिस्त आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहेत.

त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे, प्रतिभेला जन्मापेक्षा जिद्दीची साथ अधिक महत्त्वाची असते. साध्या दगडातही सौंदर्य शोधण्याची दृष्टी आणि त्याला आकार देण्याचे धैर्य ज्याच्याकडे असते, तोच खरा कलाकार ठरतो.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, महाराष्ट्राच्या या महान शिल्पकाराला विनम्र अभिवादन. त्यांच्या कलाकृती काळाच्या पलीकडे जाऊन सांगतात की, हातातील साधने मर्यादित असली तरी कल्पनाशक्ती अमर असते.

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 12:44 PM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 12:44 PM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement