राजमाता जिजाऊ- धैर्य, कर्तव्य, आणि मातृत्व यांचा अद्वितीय संगम असलेली मातृशक्ती

आज राजमाता जिजाऊ यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा संक्षिप्त आढावा.

राजमाता जिजाऊ- धैर्य, कर्तव्य, आणि मातृत्व यांचा अद्वितीय संगम असलेली मातृशक्ती मुख्य फोटो
मुख्य फोटो

राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे शौर्य, मातृत्व आणि कर्तव्याची प्रेरणा. एका आईने आपल्या संस्कारांनी आणि दूरदृष्टीने एका सामर्थ्यशाली राजाचा उदय घडवला. जिजाऊंचे जीवन हे केवळ शिवरायांचे पालनपोषण करण्यापुरते सीमित नव्हते, तर ते स्वराज्य उभारणीच्या प्राणप्रतिष्ठेचे प्रतीक होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धैर्यामुळे आजही त्यांचे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे स्थान आहे. १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे एक पराक्रमी सरदार होते .बालपणापासूनच जिजाऊंच्या मनावर पराक्रम, स्वाभिमान, आणि देशप्रेमाचे संस्कार झाले. त्यांच्या सोबतची मुले खेळण्यात दंग असताना,जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात तल्लीन. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून एक वेगळच बळ मिळायचे.
जिजाऊंचा शहाजीराजांशी विवाह झाला त्यावेळी शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मोगल आणि आदिलशाहा यांच्याकडे गेला. पण तरीही ते शूरवीर योद्धे होते. काही दुर्दैवी कारणांमुळे जेव्हा भोसले आणि जाधव या घराण्यांमध्ये वैर निर्माण झाले तेव्हा जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेरशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी महाराजांमध्ये पुरेपूर उतरला होता. शिवरायांच्या बालमनावर त्यांचे संस्कार सदैव होत होते. शिवाजी महाराजांसारख्या हिऱ्याला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊंनी केले.
शिवरायांच्या मनात स्वराज्यस्थापनेचे बीज तर रोवलेच परंतु जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची शिकवण दिली. त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई स्वराज्याच्या राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
त्यांनी छत्रपती शिवरायांना जे स्वराज्य स्थापनेचे बळ दिले,त्या जोरावर हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची फुंकर घालत प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची थाप देत त्यांना राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. पाहाता पाहाता या मराठेशाहीने दिल्लीपर्यंत आपली जरब निर्माण केली. शिवरायांनी राज्याभिषेक करावा ही त्यांच्या मातोश्रींची इच्छा शिवरायांनी पूर्ण केली आणि रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे १७ जून १६७४ रोजी त्यांचे निधन झाले.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज घडवले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होत्या जिजाबाई! स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे कल्याण, आणि न्यायाधिष्ठित समाज घडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही आदर्श मानला जातो. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.
पुणे येथील अनेक मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार त्यांनी केला. शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची अशा दोहोंची जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत जिजाऊ भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला त्यांनी जिंकून घेतला. राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्य, कर्तव्य, आणि मातृत्व यांचा एक अद्वितीय संगम. त्यांनी केवळ शिवरायांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला स्वाभिमानाने उभे राहण्याचा मार्ग दाखवला. अशा या थोर मातृशक्तीला त्रिवार वंदन!!
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-06-2026 News publication date | Time: 09:33 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-06-2026 News publication date | Time: 09:33 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement