मराठी पत्रकार, लेखक आणि वक्ते आणि जहाल राष्ट्रवादी विचारांचे पुरस्कर्ते अच्युत कोल्हटकर यांचा आज स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांचा हा लेखनप्रवास-
अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे १ ऑगस्ट १८७९ रोजी झाला. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकील आणि सुधारक नेते होते. अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव यांनी केल्यामुळे अच्युतराव त्यांचे नाव लावती. बी.ए. आणि एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सातारा आणि नागपूर येथे अनुक्रमे शिक्षक व वकील म्हणून काम केले. सन १९०७ मध्ये 'देशसेवक' ह्या पत्राचे संपादक होऊन जहाल राष्ट्रवादी राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्याबरोबरच त्यांची अनेक चढउतारांनी भरलेली राजकीय आणि वृत्तपत्रीय कारकीर्द सुरू झाली. ह्या कारकीर्दीत सन १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा पुरस्कार केल्याबद्दल आणि नंतर सन १९३० मध्ये गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.
त्यांनी सन १९१५ साली काढलेल्या 'संदेश' ह्या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला. भावनेला आवाहन करणारे, तसेच कल्पकतेने आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवून टाकणारे अग्रलेख, ‘संदेशचा अहेर’, ‘बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, ‘चहा, चिवडा, चिरूट’, ‘संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, चित्तवेधक बातम्या, आकर्षक मथळे ह्यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी चालू केलेल्या 'मेसेज' (१९१७) ह्या इंग्रजी वृत्तपत्राचा फारसा जम बसला नाही. 'संदेश' लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच सरकारने त्यांच्यावर दबाव आणला. त्यांनी काही पत्रके काढली. पटवर्धन व तुळजापूरकर यांच्या साहाय्याने 'श्रुतिबोध' (१९१२) आणि 'उषा' (१९१३) ही मासिके चालविली. 'स्वामी विवेकानंद' (आवृ. दुसरी, १९१६), 'नारिंगी निशाण' (१९१७) व 'संगीत मस्तानी' (१९२६) यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. स्वतःची नाटक कंपनी काढून काही नाटकांतून भूमिका केल्या. काही कादंबऱ्या लिहिल्या, तथापि ‘संदेशकार’ हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा होती. लोकमान्य टिळकांवरील मृत्युलेख, ‘मराठी काव्याची प्रभात’, ‘शेवटची वेल सुकली’, ‘दोन तात्या’, ‘पुणेरी जोडे’, ‘माधवाश्रमात शिवाजी’ ह्यांसारखे त्यांचे वेचक लेख मराठी वृत्तपत्रातून विशेष प्रसिद्ध आहेत. अशा या लेखकाचे आणि विचारवंताचे १५ जून १९३१ रोजी निधन झाले.
संदर्भ- मराठी विश्वकोश
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment